Thursday, June 29, 2006

एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home